जयहिंद चळवळ केवळ एक सामाजिक संस्था नसून समाजातील सर्व घटकांच्या व सर्व वयोगटाच्या स्त्री- पुरुषांनी एकत्र येत निर्माण केलेली सुदृढ समाजाच्या निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतलेली लोकचळवळ आहे.जगात महासत्ता बनण्याचे स्वप्न सर्व भारतीयांचे आहे परंतु सुदृढ समाजाची निर्मिती केल्याशिवाय आपण हे स्वप्न कधीही पूर्ण करू शकणार नाही.स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे हे कोणीही नाकारु शकत नाही तथापि एक बलशाली राष्ट्राचे उद्दिष्ट अजून खूप दूर आहे.भारत आजही विकसित राष्ट्र (Developed Nation) नसून विकसनशील राष्ट्र (Developing Nation) आहे.
गरिबी, शिक्षण, आरोग्य, आनंदी समाज या अनेक मानव विकास निर्देशांकात (Human Development Index) आम्ही प्रगत राष्ट्राच्या तुलनेत खूप मागे आहोत ही बाब आम्हाला खचितच अभिमानास्पद नाही. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात आपण एकसंघ राष्ट्र निर्माण करु शकलो नाही.प्रांत,भाषा, जात, धर्म यातील मतभेदांमुळे वरून एक असलो तरी आतून दुभंगत चाललेली आहे. गेल्या काही वर्षात ही स्थिंती चिंताजनक रीत्या बिघडत चाललेली आहे अंधश्रद्धा, दैववाद, जातीयता, धर्मांधता, भ्रष्टाचार व राजकारणातील अनैतिकता यांनी गंभीर रूप धारण केलेले आहे. हे सर्व भ्रष्ट, स्वार्थी व पोकळ नेत्यांमुळे होत आहे.जयहिंद लोकचळवळ हे दृढपणे मानत आहे की आपले नागरिक शांतता प्रिय, सहिष्णू ,समजूतदार आहेत मात्र मुठभर शक्ती वाईट हेतूंनी प्रक्षोभक व खोटा अपप्रचार करून समाजाचे स्वास्थ बिघडवित आहे. लोकशाहीची व राज्यघटनेची राजरोस पायमल्ली होत आहे या स्थितीत आपण सर्व सुबुद्ध नागरिक एकत्र येऊन ही स्थिती बदलू शकतो. एक सुदृढ समाजव्यवस्था म्हणजे बंधुभाव, समता, लोकशाही मूल्यांचे रक्षण तसेच सर्वांसाठी जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था, आरोग्य सर्वांना रोजगार, महिलांना सुरक्षित व समान संधी व स्थान, युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुयोग्य वातावरण निर्माण करू शकतो यासाठी आपण विशेषत: युवक- युवतींनी पुढे आले पाहिजे.विद्यमान राजकीय नेते हे करु शकणार नाही.युवकांनी सर्व क्षेत्रात नेतृत्व केले पाहिजे यासाठी जयहिंद लोकचळवळ आपणास आवाज देत आहे.
मित्रांनो आपण सर्व मिळून हे निश्चितच करू शकतो कारण आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे.भारतीय नागरिक बुद्धिमान आहे.प्रचंड कष्ट घेण्याची तयारी आमची आहे. जगाच्या व्यासपीठावर भारताच्या युवक - युवती, उद्योजकांनी, अंतराळ क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे आपण वैज्ञानिक दृष्टी व मानवतावादी उदार विचारसरणीतूनच जगात सर्वश्रेष्ठ होऊ शकतो. संकुचित विचार इतिहासातील संदिग्ध विषय व घटना उकरून काढून देशात सदैव संभ्रमाचे व अशांततेचे वातावरण केल्याने व नागरिकांत फूट पाडल्याने कुठलाही समाज वा कुठलेही राष्ट्र प्रगत होऊ शकत नाही. हे वैश्विक सत्य आहे!
चला तर भारताला बलशाली, प्रगत, सर्वांना न्याय देणारे आनंदी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयहिंद लोकचळवळीत सामील होऊ या !